राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती : चंद्रकांतदादा पाटील



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने वकिला मार्फत योग्य ती भुमिका न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण न मिळणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड येथे भाजपच्यावतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, लक्ष्मणराव जगताप उपस्थित होते. मराठा समाज मागास असल्याबद्दल सर्व पुरावे असून त्याचा 2700 पानांचा अहवाल तयार आहे. पण वकिलासोबत राज्य सरकार संबंधित मंञी यांनी समन्वय साधला नाही. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती दिली गेली. मूळातच काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही ही भुमिका आहे. 

राज्यात काही काळ ते सत्तेवर होते. तेव्हा आरक्षण का दिले नाही? असा सवाल पाटील यांनी काँग्रेसला केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली आणि शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी शिवसेना दादागिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.