दारूची तलफ भागविण्यासाठी त्याने ताडी पासूनच दारू बनवली, पोलिसांनी केला गुन्हा दाखल



थेऊर : सहकानामा ऑनलाईन (शरद पुजारी)

लाॅक डाऊनच्या काळात तळीरामाची मोठी पंचायत झाली आहे त्यामुळे ते नवनवीन शक्कल लढवून आपले व्यसन भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशाच एका बहाद्दराने आपल्या घरातच ताडी पासून देशी दारु बनवून आपली तलफ भागविण्याचा शोध लावला मात्र याची कल्पना लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाला लागल्यावर त्याला जेरबंद करण्यात आले आहे. 

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथक केसनंद गावच्यया हद्दीत केसनंद-थेऊर मार्गावर गस्त घालत असताना जगदंबा हॉटेल जवळ जाधव वस्ती  येथे एक इसम  तयार ताडीचा साठा जवळ बाळगून त्याची चोरुन लोकांना विक्री करीत असल्याची मााहिती  मिळाली होती. त्या ठिकाणी जाऊन छापा घातला असता तेथे व्यंकटप्पा बिचाप्पा गौड (वय 45 वर्षे, रा. बापू शंकर हरगुडे यांचे भाड्याचे खोलीत, जगदंबा हॉटेलजवळ, केसनंद.पुणे) याच्याकडे  एकूण 2000रु किं चे 100 तयार ताडीचे फुगे सापडले. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हि ताडीची दारू घरीच बनवत असल्याची कबुली दिली. झाडाची ताडी, साखर, युरिया, पिवळे सोडिअम, पाणी, इत्यादी साहित्य वापरून तो हि ताडी बनवत होता. यातील युरिया आणि सोडिअम हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तरी देखील स्वस्त दरात मिळते म्हणून ताडीला लोक पसंती देतात असे त्याने यावेळी पोलिसांना सांगितले. याबाबत लोणीकंद पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ई, तसेच भा दं वि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तो राहत असलेल्या खोली घरमालक  बापू शंकर हरगुडे वय 64 वर्षे, रा. जाधववस्ती, केसनंद याच्यावर देखील भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याने भा दं वि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग डॉ सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शोध पथक- पोलीस उप निरीक्षक हनमंत पडळकर, महिला पोलीस उप निरीक्षक वर्षा जगदाळे, बाळासाहेब सकाटे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.