दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)
– संपूर्ण जगाला वेठीस धरू पाहणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि पोलीस अधिकारीही योगदान देताना दिसत आहेत. असाच काहीसा उपक्रम यवतचे पोलीस निरीक्षक आणि कस्तुरी प्रतिष्ठान उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने अँबुलेन्सला वाहनाला भोंगे व बॅनर लावून नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाद्वारे कोरोना व्हायरस बाबत माहिती दिली आहे.आज गुरुवार दि.२ एप्रिल पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि कस्तुरी प्रतिष्ठान,उरुळी कांचन यांच्या माध्यमातून यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामस्थ व नागरिकांना कोरोना विषाणू (COVID -19 ) या आजाराबाबत परिपूर्ण माहिती देण्याची जनजागृती मोहीम चालू करण्यात आली आहे. या मोहिमेत अँबुलेन्सव्दारे लोकांमध्ये आजाराबाबत गांभीर्याने जागरूक राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाचे वतीने करण्यात येणार आहे. यावेळी तसेच मा.जिल्हाधिकारीसाहेब पुणे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात, कुणी घराबाहेर पडू नये, सर्वांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी अश्या सूचना देण्यात येत आहेत. या मोहिमेचे नियोजन यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर, सुजित जगताप हे करीत आहेत.