दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरात कोरोना महामारीचा मोठा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ३९ व्यक्तींच्या घशातील स्त्राव शुक्रवारी पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी फक्त एका व्यक्तीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालामुळे दौंडकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. शहरातील व्यापारी, नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसत आहे. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने इतर संशयितांचे स्त्राव सोमवारी तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. लागोपाठ दोन दिवस शहरात करोना बाधित रुग्ण कमी आढळले आहेत त्यामुळे शहर पुन्हा पूर्वपदावर येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.