दौंड : सहकारनामा ऑनलाईन
सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी पाचावर धारण बसली आहे. आपल्याही देशामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉक डाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मात्र यामध्ये किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. मात्र आता गावपातळीवरील कृती समित्यांनीही कोरोना व्हायराच्या पार्श्वभूमीवर अनेक कठोर निर्णय घेत कोरोना विरुद्ध आपली लढाई अधिक आक्रमक केली असून काही गावांनी आता किराणा व भाजीपाला दुकाने सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथील ग्रामपंचायत आणि कृती समितीने घेतला असून तब्बल दहा दिवस या गावातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजीपाला दुकाने बंद ठेण्यात येणार असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकामध्ये गावातील सर्व किराणा दुकानदार व भाजीपाला व्यावसायिक यांना कळविण्यात येते की, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पारगांव येथील गावस्तरीय कृती समितीने दिनांक २०/०४/२०२० ते ३०/०४/२०२० या कालावधीत (मेडीकल,दवाखाने, दुधडेरी,रेशनिंग,कृषीदुकाने
वगळून) सर्व व्यवहार बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. दिनांक २०/०४/२०२० ते ३०/०४/२०२० या कालावधीत वरील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, किराणा दुकानदार व भाजीपाला व्यवसायिक यांनी दुकाने पूर्णपणे बंद ठेवून आवश्यकता वाटल्यास घरोघरी जाऊन माल विक्री करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत वरील कालावधीत दुकाने उघडली जाणार नाहीत याची सर्व दुकानदारांनी नोंद घ्यावी. असा संदेश लिहिला असून वरील सूचनांचे पालन न केल्यास फौजदारी प्रकिया संहिता १९७३ चे कलम १४४ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व भारतीय साथ रोग अधिनियम १८५७ नुसार योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल,याची कृपया नोंद घ्यावी असा आदेश देण्यात आला आहे