बारामती : सहकारनामा ऑनलाईन
– कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देश या व्हायरसमुळे बेजार झाले आहेत मात्र भारतामध्ये करण्यात येत असलेल्या उपचारांमुळे संपूर्ण जगाचे आपल्या देशाकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्येही दिलासादायक अशी बातमी समोर येत असून बारामतीतील पहिला करोनाबाधित रुग्ण हा कोरोनामुक्त होऊन आपल्या निवासस्थानी परतला आहे. कोरोना रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत असणाऱ्या बारामतीकरांना यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. बारामतीमध्ये २९ मार्चला एका रिक्षाचालकाला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती आणि त्यामुळे बारामतीकरांच्या चिंता वाढल्या होत्या त्यातच एका वयस्क रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. हा रिक्षा चालक रुग्ण सापडल्यानंतर त्यास नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावर उपाचार झाल्यानंतर तो आता करोनामुक्त झाल्याने त्याला त्याच्या निवासस्थानी सोडण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे करोनाविरोधात लढा देणाऱ्या बारामतीकरांची चिंता दूर झाली असून त्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. काल बुधवारी हा कोरोनामुक्त रुग्ण बारामतीत परतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.काळे यांनी दिली.