दौंड शहरातील मुख्य बाजारपेठेत केला कोरोनाने शिरकाव, बेजबाबदार नागरिकांमुळे प्रशासन हतबल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

शहरातील करोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा वेग धरला आहे. मागील  दोन दिवस दौंडकरांना दिलासा मिळाला होता. परंतु या महामारीने आता थेट शहरातील बाजारपेठेतच प्रवेश केला असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या येथील ४२ लोकांचे स्त्राव दि.१३ रोजी प्रयोगशाळेत पाठविले होते त्यापैकी तब्बल आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने प्रशासना सहित दौंड करांची चिंता वाढली आहे. शहरात आढळून आलेल्या आठ बाधित रूग्णामध्ये सात पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे रुग्ण गांधी चौक, शिवाजी चौक, शालिमार चौक अशा गजबजलेल्या व्यापार पेठेतील आहेत. तसेच भैरवनाथ गल्ली, इरिगेशन कॉलनी, पंचशील टॉकीज परिसर या ठिकाणच्या रुग्णांचा ही यामध्ये समावेश आहे.

या महामारी च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाला आणखी कडक धोरण अवलंबणे गरजेचे झाले आहे. उपजिल्हा रुग्णालय, दौंड नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने परस्परांमध्ये समन्वय ठेवून उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाने बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना वेळेतच विलगीकरण करून त्यांना घरातच थांबण्या  विषयी सक्ती करावी, अशा व्यक्ती शहरात फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करावा. शहरात विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर तसेच लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता ज्या दुकानांना परवानगी नाही ती दुकाने जर उघडली जात असतील तर त्यांच्या मालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शहरात तोंड बघून कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता कोणाचीही भीडभाड न ठेवता, राजकीय दबावाला न जुमानता दोषींवर कारवाई करावी तरच शहरातील परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.