दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगावमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे, कुणी घराबाहेर पडू नका, घरीच थांबून रहा आणि आपली रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्या अशी दवंडी केडगावमध्ये देण्यात आली. मात्र केडगावमध्ये आलेल्या संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची रॅपिड अँटीजेन तपासणी न करता फक्त थर्मामिटर आणि ऑक्सीमीटर लावून टेंप्रेचर आणि ऑक्सिजन लेवल तपासल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर केडगावच्या अनेक नागरिकांनी आपला राग व्यक्त करताना, सांगायचे एक आणि करायचे एक अशी खद-खद व्यक्त केली आहे.
याबाबत केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अजित शेलार-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला जे शासकीय पत्रक मिळाले त्या आधारे आम्ही नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर संबंधीत खात्याचे पथक येऊन त्यांनी हि तपासणी केली आहे. यात ग्रामपंचायतीचा दोष नाही असे सांगीतले.
यानंतर आमच्या ‛सहकारनामा’ टीमने केडगाव आरोग्य वर्धिनी (प्राथमिक आरोग्य केंद्र) चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित होणामाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देताना ज्या लोकांचे शरीराचे तापमान (टेंप्रेचर) जास्त दाखवत आहे, ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे किंवा ज्यांना सर्दी खोकला अथवा कोरोना संबंधित लक्षणे दिसत आहेत त्यांचि आज तात्काळ रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
अशी असते रॅपिड अँटीजेन टेस्ट…
केडगाव येथील नागरिकांमध्ये रॅपिड अँटीजेन तपासणीबाबत अजूनही पूर्ण माहिती नसल्याने त्याबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज असल्याचे दिसून आले त्यामुळे आमच्या ‛सहकारनामा’ टीमने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट ही स्वॅबच्या मार्फत घेण्यात येत असल्याची माहिती दिली. हे स्वॅब नाकातून घेतले जाऊन ते रॅपिड अँटीजेन मशीनमध्ये टाकले जातात त्यानंतर काही प्रक्रिया पूर्ण करून त्याचा रिपोर्ट येतो अशी महत्वपूर्ण माहिती डॉ.संग्राम डांगे यांनी “सहकारनामा”च्या वाचकांसाठी दिली.