पावसाने आणली वाळू माफियांची चोरी उघडकीस! दहिटने बंधाऱ्यावर अडकली वाळू उपसा करणारी बोट



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून या पावसाने अनेकांचे अतोनात नुकसान केले आहे.

मात्र या पावसामुळे काही ठिकाणी चोरून सुरू असलेले धंदेही उघडे पडले आहेत.

भीमा नदीपात्रामध्ये चोरून वाळू उपसा करणाऱ्या लपवून ठेवलेल्या बोटी अचानक आलेल्या पावसामुळे उघड्या पडून त्या थेट नदीपात्रात आलेल्या पाहायला मिळत आहेत.

दौंड तालुक्यातील खामगाव-दहिटने बंधाऱ्यावर चोरून वाळू उपसा करणारी अशीच एक बोट अडकली असून ही बोट नेमकी कुणाची आहे याबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार हिंगणगाव-दहिटने येथे तेथील काही स्थानिक वाळू माफिया बोटींच्या साहाय्याने दिवस रात्र वाळू उपसा करत असतात. त्यांच्या पैकीच एक बोट पाणी पातळी वाढल्याने येथे अडकून पडली असल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून महसूल यंत्रणेच्या जाळ्यात आपसूकच शिकार आल्याची प्रचिती पाहायला मिळत आहे, मात्र आता महसूल यंत्रणा या बोटीवर कशी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.