थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
लाॅकडाऊनच्या काळात अवैध धंद्याचा समूळ नायनाट करण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी कंबर कसली असून या कालावधीत गुन्हे प्रकटीकरण पथकाने गावठी दारु विरुद्ध अभियान चालवले आहे. पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील अनेक गावातील हातभट्टी दारु अड्डे उध्वस्त केले आहेत.
काल सोमवारी गुन्हे शोध पथक पेरणे- डोंगरगाव रस्त्यावर गस्तीवर असताना पेरणे गावच्या हद्दीत मौलाई चौक येथे एका घराच्या पाठीमागे सिमेंटच्या टाकीमध्ये, ओढ्यालगत, एक महिला गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य व साधने वापरून दारू काढत आहे अशी माहिती मिळाल्याने या पथकाने तेथे जाऊन छापा घातला असता त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधनांसह ही महिला सापडली. त्या ठिकाणी 2000 लीटर कच्चे रसायन (तुरटी, नवसागर, गूळ मिश्रित) तसेच अल्युमिनिअमचा चाटू, ताटली असा एकूण रु. 42,100 किंमतीचा माल सापडला. लोणीकंद पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पेरणे गाव व झोपडपट्टी परिसरात देखील एकूण पाच अवैध दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
ही कामगिरी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. फौजदार चांदीलकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, सदाशिव गायकवाड, विकास कुंभार, ऋषिकेश व्यवहारे, कीर्ती नरवडे यांनी केली आहे .