बीड : सहकारनामा ऑनलाईन
सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे त्यामुळे आता लोकांनाही आपल्या गरजा लक्षात येत असून अति पैसा, प्रॉपर्टी या मागे न धावता आहे त्यामध्ये समाधान मानण्याचा मानस अनेकजण बोलून दाखवत आहेत मात्र काही ठिकाणी अजूनही जमीन, जुमला, पैसा यासाठी खून पडत असल्याचे वास्तव नाकारले जाऊ शकत नाही. अशीच एक घटना बुधवारी रात्री बीडमधील मांगवडगाव येथे घडली असून जमिनीच्या वादातून येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून येथील एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली तर यामध्ये एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दोन गटांमध्ये शेतीसाठी असलेला जमिनीचा वाद टोकाला गेला होता. या वादातून एका कुटुंबातील तीन जणांसह एकावर अज्ञातांनी हल्ला केला. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करून ते पसार झाले. या हत्येची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन जणांचे मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले तर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी हे हत्याकांड करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे.