अखेर ‛त्या’ बहीण-भावाच्या हत्येचे गूढ उकलले, नातलगांनीच केली ‛या’ कारणासाठी हत्या



औरंगाबाद : सहकारनामा ऑनलाईन

काल औरंगाबाद शहरात झालेल्या बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. आता या हत्येमागील खरे कारण समोर येत असून घरात असलेल्या लाखोंच्या सोन्यापाई चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्यानेच ही हत्या केल्याचे आता पोलीस तपासात समोर येत आहे. या प्रकरणी  गुन्हेशाखेच्या पथकाने या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून मुद्देमाल जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव) आणि  अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर) अशी या आरोपींची नावे आहेत. अटकेतील आरोपी सतीश हा हत्याकांडातील मयतांचा चुलत भाऊ आहे तर अर्जुन हा मेहुणा आहे. 

काल औरंगाबाद येथील सातारा परिसरात किरण आणि सौरभ या दोन बहीण भावांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पोलिसांना ज्या बंगल्यामध्ये हत्या झाली तेथे चार चहाचे कप आढळले होते. त्यावरून ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा दाट संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयतांच्या  मोबाईलची तपासणी केली असता त्यांना मयताचे चुलत भाऊ सतीश आणि त्याचा मेहुणा अर्जुन या दोघांवर संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या प्रश्नांच्या भडीमारासमोर दोघांचेही पितळ उघडे पडले आणि त्यांनी हे हत्याकांड घरात असणाऱ्या सोन्यासाठी केल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेलं सोन जप्त करत ही हत्या फक्त सोन्यासाठी केली की अजून काही कारण होते याचा शोध घेत आहेत.