डॉक्टर ‛कोरोनाचे’ शिकार कशामुळे झाले याची माहिती अफवा पसरविणाऱ्यांनी द्यावी : डॉ. जयसिंग थोरात



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील विविध गावांतील डॉक्टरांना काही अफवेकऱ्यांनी टार्गेट केल्यानंतर आता दौंड ग्रामीण मेडिकल असोसिएशन ने याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे आणि डॉक्टर ‛कोरोनाचे’ ‛शिकार’ कशामुळे होतात याची माहिती अफवा पसरविणाऱ्यांनी द्यावी असे आव्हान त्यांनी अफवेकऱ्यांना दिले आहे.

याबाबत दौंड ग्रामीण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयसिंग थोरात यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली असून डॉक्टर हा समाज घटकातील खूपच महत्वाचा भाग असून रात्र असो की दिवस हेच डॉक्टर लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकटात सापडलेल्या रुग्णांना जीवदान देण्यासाठी त्यांच्या सेवेत पोहोचून त्यांना मदत करतात हे मात्र अफवेकरी विसरले असतील असा चिमटा त्यांनी यावेळी काढला आहे. ज्यावेळी अपघात होतो, कुणाच्या अचानक छातीत दुखू लागते, कुणाला रात्रीच्या वेळी प्रसव कळा सुरू होतात, कुणी विहिरीत पडते, कुणी औषध पिते, कुणाला साप चावतो त्यावेळी हेच डॉक्टर आपली झोप विसरून त्या पेशंटसाठी रात्र-रात्र जागून काढतात हे या लोकांना दिसत नाही किंवा ते आंधळेपणाचे सोंग घेत असावेत असा उपरोधक टोलाही त्यांनी अफवेकऱ्यांना लगावला आहे. ज्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती त्यांची हिस्ट्री पाहिली तर ते आपल्या दवाखान्यातच रुग्णांची सेवा करत असल्याचे समोर येत असून त्यांनी आपले कर्तव्य निभावताना जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर ते गुन्हेगार आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर डॉक्टरांना कुणी टार्गेट केले किंवा त्यांच्या बाबत अफवा पसरवून त्यांना तुच्छतेची वागणूक दिली तर दौंड ग्रामीण मेडिकल असोसिएशन हे खपवून घेणार नाही आणि अशा लोकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही शेवटी डॉ.जयसिंग थोरात यांनी सहकारनामा’शी बोलताना दिला आहे.