लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त आज शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटे येथील मानकरी सतीश आगलावे यांनी श्रींची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. शनिवारी नवीन वर्षातील पहिली चतुर्थी तसेच जोडून सुट्ट्या आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोरोना या रोगामुळे राज्य सरकारने निर्बंध घातल्यामुळे मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात आले नाही. देवस्थान मार्फत भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी सॅनीटायजर व चप्पल स्टॅन्ड बसवण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंगसाठी देवस्थानतर्फे रंगाचे चौकोन आखले होते. मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात आले नाही. तसेच देवस्थान तर्फे मंदिर परिसरात गर्दी करू नये तसेच एका जागेवर न थांबण्याचा सूचना देण्यात येत होत्या.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला मात्र तसेच शासनाच्या आदेशानुसार कीर्तन व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.