कोरोना’चे फेक मेसेज सोशल मीडियावर पसरविणाऱ्यांवर कारवाई



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

सध्या संपूर्ण राज्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहे. परंतु आता तशीच अजून एक समस्या निर्माण होत असून त्यामुळे लोक अजूनच त्रस्त बनले आहेत. हा कुठला आजार नसून सोशल मीडियावर पसरविले जाणारे कोरोना बाबत चे फेक मेसेजमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर कोरोनाबाबत विविध फेक मेसेज येत असून या मेसेजमध्ये अधिकाऱ्यांची नावे टाकून हे मेसेज सोशल मीडियावर पसरविले जात आहेत. हि गंभीर बाब समोर आल्यानंतर याची दखल खुद्द पुण्याचे  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली असून सोशल मीडियावर फेक मेसेज पोस्ट करणाऱ्याव्यक्ती आणि ते व्हायरल करणाऱ्या व्यक्तींचा सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ‘कोरोना विषाणूचा संसर्ग लवकरच तिसऱ्या टप्प्यात पोहणार आहे…अशा प्रकारचे फेक मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. याबाबत काही पत्रकार आणि वृत्तपत्रांनी या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना संपर्क केला असता त्यांनी हे मेसेज चुकीचे असल्याचे सांगत हे फेक मेसेज सोशल मीडियावर पसरविणाऱ्या व्यक्तींचा सायबर क्राईम शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.