नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ जाताना दिसत असून दिल्ली मधील भाजपचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत भाजप विरुद्ध आप ची जोरदार टक्कर होईल असे दिसत होते मात्र जसजसे निकाल हाती येऊ लागले तसतशी आप ची हवा निघताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचा होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.
सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने असून सकाळी 9:45 वाजेपर्यंत 70 जागांपैकी बीजेपी 49, आप 20, काँग्रेस 1 जागेवर पुढे दिसत होते. त्यामुळे भाजप ने दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. सध्या येणारे कल हे केजरीवाल आणि आप पार्टीसाठी चिंतेचे असून भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये ‘आप’ नव्हे तर ‘भाजप’ चा मुख्यमंत्री येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
‘मुस्लिम’ बहुल भागातही ‘भाजपा’ पुढे
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहेत . पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत असताना आता मुस्लिम बहुल भागातही भाजपा ने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. मुस्लिम मतदारांनी यावेळी आप सोबत न जाता भाजपा सोबत जाण्याचे ठरवले असे एकंदरीत येत असलेल्या निकालांवरून दिसत असून एकंदरीच दिल्लीकरांनी आप पक्षाला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येत आहे.