पुणे : थकीत वीजबिलापोटी राज्यातील शेतकर्यांच्या कृषीपंपाची वीज बेधडकपणे खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला होता, अतिवृष्टी,अवर्षण आदींनी राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाच ऐन उन्हाळामध्ये शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत होते. त्यातच शेतीपंपांची अवास्तव बिल आकारणी, लाखो रुपयांची थकबाकीची बिले देऊन सक्तीच्या वीज बिल वसुलीने बळीराजाचा अडचणीत आला होता.
या संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार राहुल कुल, व भारतीय जनता पार्टीच्या इतर विधानमंडळ सदस्यांनी विधानभवन परीसरात आंदोलन करून सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत शेतकर्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम थांबविण्याची वेळोवेळी मागणी लावून धरली होती. या मागणीला आता मोठे यश येताना दिसत असून आज विधानसभेत राज्य सरकारच्या वतीने पुढील तीन महिने वीज तोड न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिला संदर्भात कुठलाही ठोस उपाय, दिलासा न देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने संपूर्ण राज्यात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारला विजतोड थांबविण्यासाठी दबाव आणला होता. यासाठी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातही निदर्शने करण्यात आली होती. आज राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाने भाजपचे हे आंदोलन यशस्वी झाल्याचे दिसत आहे.