Birthday Special – मोठ्या घराण्यात वाढूनही ‛पाय जमिनीवर’ ठेऊन संस्कारांची चादर ओढलेल्या ‛कांचनताई’



सहकारनामा : वाढदिवस विशेष (अब्बास शेख)

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांच्या पत्नी सौ.कांचनताई कुल यांचा आज वाढदिवस. वाढदिवस म्हटले की ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीच्या आजपर्यंतच्या वाटचालीची, समाज जीवनात वावरण्याची आणि त्यांच्याबाबत आलेल्या अनुभवांची आठवण येऊन लिखानात ते उतरवणे साहजिकच आहे. म्हणूनच कांचनताई यांच्याबाबतही असे अनेकांना अनुभव आलेले आहेत आणि त्याचा स्वतःलाही आलेला प्रत्यय येथे लिखाणातून उतरवणे गरजेचे वाटते. 

‛कुल’ घराण्याची संस्कारी सून म्हणून कांचनताई यांना तालुक्यामध्ये ओळखले जाते. हि त्यांची ओळख त्यांनी नावासाठी कमवली नसून ती त्यांच्या संस्कारातून पुढे आलेली आहे यात शंका नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी दौंड तालुक्यातील केडगावमध्ये याचा प्रत्यय येथील जेष्ठ नागरिकांना आलाच होता. झाले असे होते की एका दवाखाण्याच्या उदघाटनाप्रसंगी कांचनताई केडगावमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनेक जेष्ठ आणि तालुक्यातील मुरब्बी नेते तेथे उपस्थित होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर ताई दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या तेवढ्यात तेथील कार्यकर्त्यांनी त्यांची ओळख तेथे बसलेल्या काही जेष्ठ मंडळींशी करून दिली आणि ताईंनी मोठ्या अदबीने या पाच ते सहा जेष्ठ मंडळींचे चरण स्पर्श करून आशिर्वाद घेतले. हे सर्व घडत असताना सर्वजण अवाक होऊन आश्चर्याने ताईंची हि कृती पाहत होते. कारण यातील जवळपास तीन ते चार जेष्ठ नागरिक हे आ.कुल यांच्या विरोधी पक्षात काम करणारे होते. मात्र संस्कारांना जात, पात, पक्ष हे कधीच आडवे येत नसतात हे ताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले होते. काही वेळाने या जेष्ठांची कुजबुज सुरू झाली आणि त्यातून एकच चर्चा ऐकायला मिळाली… कुल घराणं म्हटल्यावर संस्कार हे आलेच की.

आम्ही पत्रकार मंडळी मात्र कधी अशा गोष्टींवर जास्त विश्वास ठेवत नसतो कारण राजकारणासाठी लोक असे काही ना काही करत असतात असा आमचा अनुभव म्हणा किंवा समज असतोच. पण या अनुभवाला छेद देणारा किस्सा माझ्या स्वतः सोबतही घडला… मी काही कामानिमित्त माझ्या मुलासह राहू येथील आमदार निवासामध्ये गेलो होतो. मात्र विद्यमान आमदार राहुल कुल तेथून काही वेळापूर्वीच कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही मात्र बाहेर प्रांगणात माजी आमदार रंजनाताई कुल व काही मंडळी बसली होती. माझ्या सोबत माझा मुलगा झियान ही आला होता. मी ताईंशी गप्पा मारत असताना माझा मुलगा अचानक उठला आणि आत आमदार निवासमध्ये गेला.(त्याला कुणीतरी खिडकीतून खुनवुन आता बोलावले होते हे त्याने मला नंतर सांगितले)  जवळपास मी अर्धा तास मा.आ.रंजनाताईंशी गप्पामारून झाल्यावर मुलगा अजून का बाहेर येईना हे पाहण्यासाठी आत गेलो, तर आमचे चिरंजीव कांचनताईंच्या बाजूला बसून केक आणि इतर पदार्थांवर ताव मारत असल्याचे दिसले आणि दुसऱ्या बाजूला त्यांची कन्या मायरा बसलेली दिसली. हे पाहून मी थोडा आश्चर्यचकित झालो कारण ताई माझ्या मुलाला स्वतः पदार्थ वाढत होत्या आणि मायेने त्याची विचारपूस करत होत्या. 

मी हे सर्व चित्र पाहिले आणि त्यांच्या निवडणुकीच्या आठवणी ताज्या झाल्या. कुठे त्या लाखोंच्या गराड्यात भाषण देणाऱ्या, हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात 24 तास असणाऱ्या आणि आलिशान गाड्यांच्या ताफ्यासह जिल्ह्यात फिरणाऱ्या ताई येथे एका सर्वसामान्य कुटुंबातील 10-12 वर्षाच्या मुलाला आपल्या जवळ घेऊन प्रेमाने, अदबीने त्याची विचारपूस करत त्याला जेवणाचा आग्रह करत होत्या आणि ते आम्ही डोळ्याने पाहत होतो. (आतमध्ये ताई आहेत हे आम्हाला माहीतही नव्हते आणि मी आत गेलो त्यावेळी तेथे दिखावा करण्यासाठी म्हणावे तर दुसरे बाहेरील कोणीच नव्हते) 

हे सर्व पाहून माझ्या आतील पत्रकार जागा झाला आणि मी हे क्षण माझ्या मोबाईलमध्ये टिपून ते आठवण म्हणून जतन करून ठेवले होते. तालुक्यातील जनतेला, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना जीव लावण्याचे, त्यांचा आदर करण्याचे हे संस्कार या घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या झालेले असतात, ते ट्रेनिंग घेऊन कधीच येत नसतात तर ते रक्तात आणि घराण्यात असावे लागतात हेच यावरून स्पष्ट झाले होते.