वाढदिवस रद्द | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चाहत्यांना आवाहन… वाढदिवसाच्या फ्लेक्स, जाहिराती ऐवजी येथे मदत करा

मुंबई : इरशाळवाडी येथील दुर्घटना घडल्यानंतर सर्वच स्तरातून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले असून येत्या 22 जुलैला येणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच आपले चाहते आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरशाळवाडी या गावाच्या पुनर्उभारणीसाठी देण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.

इरशाळवाडी (ता. खालापूर) येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे माहिती देताना, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत मात्र खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शासन प्रत्येक बाबीवर बारकाईने नजर ठेवून आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
इरशाळवाडी वस्तीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करुन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इरशाळवाडी हे ठिकाण ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण’च्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच यापूर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या नव्हत्या. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

इरशाळगड ठाकूरवाडी याठिकाणी रात्रीपासून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य व मदतीचा ओघ चालू झाला आहे. प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रात्रीच दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत साहित्य व पथके पाठवून मदत कार्य सुरू केले आहे. दुर्घटनेनंतर अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, बदलापूर, पनवेल, वाशी व मुंबई येथून मदत पथके रवाना झाली. ८ रुग्णवाहिका, अधिकारी- कर्मचारी, २ जेसीबी पनवेल महानगरपालिका येथून पाठविण्यात आले आहे.

कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, शिवदुर्ग मंडळाचे स्वयंसेवक देखील या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.