केडगाव, दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव हद्दीत (भांडगाव, केडगाव वेशीवर) असणाऱ्या एच पी पंपासमोर दुचाकी आणि पीएमपीएल बस चा भीषण अपघात होऊन यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकी थेट बसखाली आली तर तरुण उडून रस्त्यावर पडला. ही घटना आज २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:१५ च्या आसपास घडली आहे.
बालाजी गाढवे असे या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव सांगितले जात आहे. दुचाकीवरील हा तरुण एच पी पंपावरून रस्ता ओलांडून चौफुल्याच्या दिशेने जात होता तर चौफुल्याकडून पुण्याच्या दिशेने पीएमपीएल बस जात होती. रस्ता ओलांडत असताना पीएमपीएल बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
या अपघातामध्ये दुचाकी वाहन बस च्या खाली गेले तर दुचाकी चालवणारा तरुण बाजूला फेकला गेला. या भयंकर अपघातामध्ये या तरुणाला जबर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे दिसत होते. गंभीर जखमी तरुणाला बस मधील महिला प्रवाशी सुरेखा साळुंके यांनी 112 ला फोन करुन पोलीस मदत मागवत यवत पोलिसांच्या मदतीने चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या उपचार सुरु आहेत.






