औरंगाबाद : सहकारनामा
राज्यात हडकंप माजविणाऱ्या राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाला आता नवे वळण लागले असून खुद्द औरंगाबाद पोलिसांनीच यात मोठा खुलासा केला आहे.
औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार मागील 1 वर्षामध्ये मेहबूब शेख यांचा त्या तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याचे समोर येत आहे.
हि बाब तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जोडली जात असून मागील 1 वर्षात बलात्कारातील आरोपी मेहबूब शेख आणि यातील फिर्यादी तरुणी हे संपर्कात नसल्याचे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी खुलासा केला आहे.
याबाबत आता औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. खुद्द सहाय्यक पोलीस आयुक्तांनी यात लक्ष दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा संपूर्ण तपास सुरू आहे.
असे आहे प्रकरण…
औरंगाबाद पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, मेहबूब शेख हे सर्व आरोप फेटाळून लावत आपला या प्रकाराशी सबंध नसल्याचा फेसबुकच्या माध्यमातून खुलासा केला. तर औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिला दि. 14 नोव्हेंबर रोजी रात्री 9:00 वाजण्याच्या सुमारास महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेत गाडीत बसवून निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याची तक्रार संबंधित तरुणीने सिडको (औरंगाबाद) पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार मेहबूब शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल होताच महेबूब शेख यांनी फेसबुकच्या माध्यमातून खुलासा करताना या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट करताना आपल्याला औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळताच आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो असून मेहबूब इब्राहिम शेख या नावाची व्यक्ती शिरूर तालुक्यात दुसरी कोणी नसून त्या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली होती.
तसेच संबंधित तरुणीला आपण प्रत्यक्ष किंवा फोनवर भेटलो, बोललो नसून मी दि. 10 आणि 11 नोव्हेंबरला मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी आरोपी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती.
याबाबत शेख यांनी बोलताना आपण 14 नोव्हेंबरला गावाकडे होतो आणि त्याबाबत पोलिसांना सर्व पुरावे देण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
या प्रकरणामागे मोठे राजकारण असून यामागे नेमके कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे आवाहनही मेहबूब शेख म्हणाले यांनी केले होते.