Big News : राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता! गृहमंत्र्यांचा घेतला जाणार राजीनामा?



मुंबई : सहकारनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिरसिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला असून उद्या सकाळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपद काढले जाऊन ते जयंत पाटलांकडे जाईल अशी शक्यता विविध वृत्त वाहिन्या आणि सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुली जमा करायला सांगितले होते असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी आपल्या पत्रातून केला आहे. 

या लेटर बॉम्ब नंतर राज्यात जणू राजकीय त्सुनामी आल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, या प्रकरणामुळे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर या प्रकरणी आता राज ठाकरे यांनीही ट्विट करून कडक शब्दात सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बार, रेस्टॉरंटकडून 1 ते 2 लाख रुपये दर महा जमा करायला लावून सुमारे 100 कोटीची वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिले होते असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या पत्रातून केला आहे. 

या आरोपाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून पोलीस आयुक्त पदावरून परमबीर यांना दूर केल्यामुळे त्यांनी हा आरोप केल्याचा आरोप गृहमंत्री देशमुख यांनी केला आहे.

परमबीर यांनी लिहिलेल्या लेटरबॉम्ब नंतर आता महाआघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप आला असून उद्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाऊ शकतो असे भाकीत वर्तवले जात आहे.