दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
दौंड शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल रात्री 10 वाजता बंद करावी लागणार आहेत, मात्र हॉटेल व्यवसायिकांना रात्री 11 वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. संचार बंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही दौंड पोलिसांनी केले आहे.
शहर व परिसरात कोरोना चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे, रोजच बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोरोना पासून बचावा साठीच्या उपाय योजनांची नागरिकांनी जबाबदारीने अंमलबजावणी केली व वाढती कोरोना रुग्णांची संख्या घटली तरच शहरावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाईल, रुग्ण संख्या वाढ थांबली नाही तर मात्र शहरात अधिक कठोर निर्बंधाचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाईल असे बोलले जात आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी हे ध्येय समोर ठेवून शहरातील प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.