Big News : दौंड तालुक्यात पोलीस दलाचा चुकीचा वापर, बादशहा शेख याला ‘या’ मुळे आत टाकला ! राज्यात महापुरुषांचे अपमान सहन करणार नाही – विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा हल्लाबोल

दौंड (मिरवडी) : दौंड तालुक्यात पोलीस दलाचा चुकीचा वापर करून प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरु आहे. दौंड शहरातील मा.नगराध्यक्ष बादशहा शेख याला आत टाकले का तर विरोधक आपल्या सोबत येत नाहीत म्हणून..! राज्यात महापुरुषांचे अपमान सुरु आहेत, आमचे दैवत शिवाजी महाराजांचाही अपमान केला जात आहे. हे महाराष्ट्रात चालणार नाही ते खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील मिरवडी येथे दिला आहे. ते मिरवडी येथील आदर्श ग्रामपंचायत इमारतीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

दौंड तालुक्यातील मिरवडी येथे मिरवडी ग्रामपंचायतीच्या नविन वास्तुच्या उदघाट्न प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार हे आले होते. यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, वैशालीताई नागवडे, आप्पासाहेब पवार, विरधवल जगदाळे, हाजी सोहेल खान, सुशांत दरेकर, मिरवडीचे सरपंच सागर शेलार, उपसरपंच शांताराम थोरात, नितीन दोरगे, विकास खळडकर, दिलीप हंडाळ, हे उपस्थित होते. आज सकाळी 8:30 वाजता अजितदादा यांच्या हस्ते मिरवडी ग्रामपंचायतीच्या नविन भव्य इमारतीचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांचे कौतुक केले. मिरवडी सारख्या छोट्या गावातील ग्रामपंचायतीचे काम हे स्तुतीयोग्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

राज्यात महिला आणि महापुरुषांच्या अपमानाचे पेव

राज्यात सध्या महिला आणि महापुरुषांचा अपमान करण्याचे पेव फुटले आहे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतले जाणार नाही. अब्दुल सत्तार यांसारखे मंत्री लोक सुद्धा बेभान होऊन महिलांबद्दल अर्वाच्य भाषा वापरतात, राज्यपाल महापुरुषांबद्दल वाट्टेल ते बोलतात त्यामुळे या विरोधात येत्या 17 तारखेला मुंबईत सर्व विरोधीपक्ष मिळून मोठा धडक मोर्चा काढणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात आणि दौंड तालुक्यात सध्या गुतवागूतवीचे राजकारण केले जात असून दौंडच्या विविध प्रकरणांचा अजितदादा यांनी दाखला देत पोलीस दलाचा चुकीचा वापर करण्यात येत असल्याचा घनाघात त्यांनी केला. विरोधक आपल्याकडे येत नाहीत म्हणून मुद्दाम त्यांना पोलिसांकरवी त्यांना त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगत बादशहा शेख यांना मुद्दाम आत टाकण्यात आल्याचे सांगितले आणि येथे काय मोगलाई लागलीय काय असा सवालही उपस्थित केला.