सुधीर गोखले
सांगली : पावसाने ओढ दिल्याने कोयना धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस सुरु न झाल्याने पाणी पातळीमध्ये कमालीची घट झाली असून कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग थांबवण्यात आला आहे. २६ जून पर्यंत कृष्णा नदी तीरावरील सिंचन उपसा बंदी आदेश देण्यात आल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकारे यांनी ‛सहकारनामा’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.
देवकारे म्हणाल्या, वारणा आणि कोयना धरणांमधील पाणी साठा कमी झाला आहे. पाऊस अजूनही सुरु झालेला नाही त्यामुळे उपलब्ध पाणी पुरवणे आवश्यक आहे. सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील टेंभू बॅरेज ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत सिंचनासाठीची उपसा बंदी आदेश शुक्रवार २३ जून रात्री १२ पासून सोमवार २६ जून रात्री १२ पर्यंत असणार आहे.
त्या पुढे म्हणाल्या पर्जन्यमान आणि त्या वेळच्या परिस्थिती नुसार पुढील नियोजन करण्यात येईल या दरम्यान वरील कालावधी मध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबधितांचा पाणी आणि विद्युत पुरवठा परवाना एक वर्षासाठी निलंबित केला जाईल उपसा करणारे संच जप्त करून पुढील कारवाई केली जाईल उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा औद्योगिक क्षेत्रामधील आस्थापनांनी आपले सांडपाणी थेट नदीपात्रात सोडू नये अन्यथा कारवाई केली जाईल.