अख्तर काझी
दौंड : खासदार सुप्रिया सुळे व मा. आमदार रमेश थोरात यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मला अपमानित केले, अपमानित होऊन मी कदापि राष्ट्रवादीसोबत काम करणार नाही, त्यामुळे आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम करणार नाही असे पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले, व तशा बातम्याही सर्वत्र झळकल्या आहेत. बादशाह शेख यांच्या या भूमिकेमुळे येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काल रात्री (दि.23) मात्र अचानक पणे बादशाह शेख यांची नाराजी दूर झाली आहे, व त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केली आहे अशी बातमी शहरात सर्वत्र पसरली. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बादशाह शेख यांच्याशी बोलल्याने बादशाह शेख यांनी आपला निर्णय बदलला आहे व ते पुन्हा पक्षात सक्रिय झाले आहेत अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली. या सर्व घटनांचा स्वतः बादशहा शेख यांनी पूर्णपणे इन्कार केला आहे. माझा झालेला अपमान मी विसरलेलो नाही, माझी अद्यापही पक्षावर, पक्षनेतृत्वावर नाराजी कायम आहे असे सांगत घरवापसी या सर्व अफवा आहेत याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन शेख यांनी केले आहे.
दि.23 ऑक्टोबर, रोजी नगरपालिकेतील माझ्या सहकारी नगरसेवकांनी मला येथील हॉटेल राजधानी येथे चर्चेसाठी बोलाविले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्यांनी सांगितले की,दि.26 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेची सभा आहे, तुम्ही आमचे गटनेते आहात, तुम्ही सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही सोमवार दि. 25 रोजी जो नगरसेवक पदाचा व जिल्हा नियोजन समिती सदस्याचा राजीनामा देणार आहात तो देऊ नका. नगरपालिकेची सभा होऊ द्या, आपण चर्चा करू व मग तुम्ही अंतिम निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत राहू असे सांगितले. तुमची पक्ष नेतृत्वावर ( रमेश थोरात) नाराजी आहे, तुम्ही आम्हाला का सोडून जाता, काहीतरी मार्ग काढू असेही माझे सहकारी या चर्चेत म्हणाले. त्या चर्चेदरम्यान मला कोणाचाही फोन आलेला नाही, आणि माझी नाराजी दूर व्हावी यासाठी कोणीही माझ्याशी बोललेले नाही. ना.अजित पवार यांचा फोन वगैरे या सर्व अफवा आहेत. या बैठकीसाठी आम्ही सर्व एकत्र आलो होतो त्याचा फोटो काढून, बादशहा शेख पक्षात परत आले आहेत, ऑल इज वेल असे काहीतरी लिहून सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल करण्यात आला आहे, यात काहीच तथ्य नाही असा खुलासा बादशहा शेख यांनी केला आहे.
मी राष्ट्रवादी बरोबर काम करणार नाही असे जाहीर केल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाने साम, दाम सहित आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आमच्या पक्षात येऊन नगरपालिका निवडणूक लढवा अशी ऑफर मला आली आहे, आणखीनही पक्ष,संघटना नी मला निमंत्रण दिले आहे परंतु माझे समर्थक, सहकारी नगरसेवक यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही आणि घेतलेला सुद्धा नाही असेही बादशाह शेख म्हणाले आहेत.
माझ्या आणि प्रेमसुख कटारिया यांच्या गळाभेटीच्या फोटो खाली, ईमली का बुटा….जंगल मे दो शेर… अशा गाण्यांची ओळी लिहून काही कार्यकर्त्यांनी तो फोटो व्हायरल केला आहे. यांना आत्ताच आमच्यावरील इतके प्रेम कसे जागे झाले असा प्रश्नही बादशाह शेख यांनी उपस्थित केला आहे, असे फोटो टाकून कोणी दिशाभूल करू नये, मला सन्मानाने बोलावून जो माझ्याशी चर्चा करील त्यांच्याबरोबर शहर विकासासाठी म्हणून मी निश्चित काम करायला तयार आहे असे मी आधीच जाहीर केले आहे. तशी जर यशस्वी चर्चा कोणाबरोबर झाली तर मी स्वतः ती जाहीर करेन तोपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बादशहा शेख यांनी दौंडकर नागरिकांना केले आहे.