मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला पुन्हा एकदा अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांसह 30 आमदार गेले आहेत. वाय बी चव्हाण सेंटरवर हे सर्व नेते, आमदार शरद पवारांशी बैठक करत आहेत.
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी सर्व आमदारांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घ्यावे तसेच त्यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देऊन आशिर्वाद द्यावेत अशी मनधरणी हे सर्वजण करत असल्याची माहिती समोर येत आहे. तर हे सर्व आमदार शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले असून त्यांची भूमिका समजून घ्यावी यासाठी शरद पवारांची मनधरणी केली जात असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
कालच अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली होती या भेटीमध्ये या सर्वांनी आपली भूमिका शरद पवारांसमोर मांडली होती. आज पुन्हा एकदा अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांसह 30 आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले असून गेली 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.