Big News : दौंडमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारांसाठी पैसे घेणाऱ्या खाजगी दवाखान्यांकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कडक इशारा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी येथील प्रशासनाने शहरातील तीन खाजगी दवाखाने अधिग्रहित केली आहेत. परंतु यापैकी दोन दवाखान्यानी कोरोना बाधित रुग्णांना उपचार देण्यासाठी असमर्थता दर्शविली आहे तर एका दवाखान्यात उपचार दिले जात आहे परंतु त्याकरिता बाधित रुग्णाच्या नातलगांकडून मोठी रक्कम वसूल केली जात आहे, असा आरोप करत या दवाखान्यांच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनकर्ते आबा वाघमारे, प्रशांत धनवे, विनायक माने, नरेश डाळिंबे यांनी तहसीलदारांकडे संबंधित दवाखान्याच्या निषेधाचे निवेदन दिले आहे. तसेच रुग्णांकडून पैसे  वसूल करणाऱ्या दवाखान्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे सुद्धा केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आबा वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांना सांगितले की, दादा येथील प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी दवाखान्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी नेले असता मोठी रक्कम उपचार सुरू करण्याआधी मागितली जात आहे, व ही बाब येथील अधिकाऱ्यांना कळविली असता ते सुद्धा उपचाराचे पैसे भरले पाहिजेत असे सांगत आहेत अशी तक्रार केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की तेथील अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला सांगितले आहे की अशा रुग्णांचे मोफत उपचार केले पाहिजेत, मी तर बोलतोच जिल्हाधिकाऱ्यांशी, तुम्ही  तुमची तक्रार तहसीलदारांकडे द्या. आता मीच माझ्या स्टाईलने पाहतो असे अजित पवार यांनी सांगत याबाबत कुणाची हयगय करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दौंड शहरातील दोन खाजगी दवाखाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी असताना तसेच तहसीलदारांच्या आदेशा नंतरही कोरोना बाधित रुग्णांना उपचार देण्यास नकार देत आहेत तर एक दवाखान्याकडून अनामत रक्कम, औषधांचे पैसे व PPE किट्सचे पैसे आकारले जात आहेत त्यामुळे शासनाचे आदेश धुडकावणाऱ्या दवाखान्यांच्या प्रमुखांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व  भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या दवाखान्या विरोधात येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनीसुद्धा दौंड पोलिसांकडे तक्रार केली आहे, मात्र अध्याप कुणावरही कुठलीच कारवाई झालेली नाही त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.