अख्तर काझी
दौंड : दसरा सणाचे सोने लूटण्याआधीच चोरट्याने येथील सराफ व्यापाऱ्याचे 62 तोळे सोने लुटून नेले असल्याची घटना घडली आहे. शहरातील शालिमार चौक येथील रत्नत्रय ज्वेलर्स या सराफ पेढीचे 62 तोळे सोन्याचे दागिने(30 लाख 18 हजार 504 रु.) असलेली बॅग चोरट्याने लंपास केली आहे.
रत्नत्रय ज्वेलर्स पेढीचे व्यवस्थापक नंदकिशोर विधाते(रा. दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.50 ते 5वा. दरम्यान येथील हॉटेल सिटी इन परिसरात सदरची घटना घडली. फिर्यादी हे आपल्या दुकानाचे 62 तोळे सोन्याचे बनविलेले दागिने घेऊन पुण्याहून दौंडला आले होते.
मालकाचे नातलग त्यांच्यासोबत होते म्हणून दौंडला आल्यावर फिर्यादी यांनी आधी नातलगाला येथील फॉरेस्ट ऑफिस परिसरात असणाऱ्या मालकाच्या बंगल्यावर सोडले व दुचाकी वर सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग घेऊन ते रत्नत्रय ज्वेलर्स या आपल्या दुकानाकडे निघाले असता रस्त्यामध्ये चोरट्याने दुचाकी वरील सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग लंपास केली.
शहरातील वर्दळीच्या परिसरात सदरची चोरीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून चोरटे आपले काम फत्ते करीत आहेत की काय? असा संशय या घटनेमुळे बळावला जात आहे. नेहमीप्रमाणे परिसरामध्ये सीसीटीव्ही चे प्रमाण कमी असल्यामुळे तपासासाठी आवश्यक असे पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही अशी माहिती समोर येत आहे.
शहरातील पडणारे दरोडे, चोऱ्या लुटमार रोखणे ही फक्त पोलिसांचीच जबाबदारी नसून त्यासाठी व्यापारी वर्ग, नागरिकांनीही सुरक्षिततेचे उपाय अमलात आणण्याची गरज झाली आहे. शहरात सामाजिक कामे करणाऱ्या पक्ष, संघटनांची मदत घेत शहरातील बाजारपेठेत व मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येथील बँकांनी, व्यापाऱ्यांनी फक्त आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही न लावता दुकानासमोरून जाणाऱ्या रस्त्यांवरीलही चित्रीकरण होईल अशाप्रकारे सीसीटीव्ही लावावेत जेणेकरून अशा घटनांनंतर संशयास्पद व्यक्ती ,चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद होतील व पोलिसांना तपासासाठी योग्य दिशा मिळण्यास मदत मिळेल.