पारगाव येथील वि.का. सहकारी सोसायटीत 36 लाख 29 हजार रुपयांचा अपहार, तिघांवर गुन्हा दाखल

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू-मालू) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये सुमारे ३६ लाख २९ हजार २२० रुपयांचा अपहार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत संस्थेत काम करणाऱ्या बंडू आबाजी भोंडवे, निखिल संदीप ताकवणे आणि बी.डी. कुलथे या तीन जणांवर यवत पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथम श्रेणी १ लेखा परीक्षक राजेश सुदाम भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पारगांव (सा. मा.) कार्यकारी सेवा संस्थासोसायटी विविध मर्या. पारगांव ता. दौंड, जि. पुणे या संस्थेच्या अंतर्गत ठिबक विभाग आणी खत विभागमध्ये तात्कालीन ठिबक विभाग प्रमुख बंडु आबाजी भोंडवे आणि खत विभाग प्रमुख निखील संदिप ताकवणे यांनी एकत्रीतरित्या सन २०२० – २०२१ या कालावधीत एकुण रक्कम ३६,२९,२२०.५२ / – लाखाचा आर्थिक गैरव्यवहार करून अपहार केला होता आणि अपहार करून संघाचे पर्यायाने संघ सभासदांचे आर्थिक नुकसान केले असल्याचे निदर्शनास आले होते.

या प्रकरणात प्रमाणित लेखापरीक्षक बी.डी. कुलथे यांनी त्यांच्या जबाबदारी व कर्तव्यामध्ये कसुर केल्याचे स्पष्ट झाले असल्याने वरील तिघांविरोधात फिर्यादी राजेश सुदाम भुजबळ (लेखा परीक्षक श्रेणी १ सहकारी संस्था पुणे) यांनी फिर्याद दिली असल्याने यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि लोखंडे हे करीत आहेत.