पुण्यात चाललंय काय..?10×10 च्या खोलीसाठी भावाकडून बहिणीचे तुकडे तर दुसरीकडे दुकानासाठी बहिणीने भावाला शूट केले

पुणे : पुण्यात एका आठवड्यामध्ये दोन भयानक घटना घडल्या असून या दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. या दोन्ही घाटंनांमध्ये बहीण आणि भावाची हत्या झाली आहे. दोन्ही घटना प्रॉपर्टीच्या वादातून घडल्या आहेत हे विशेष.

पहिली घटना ही शिवाजीनगर येथील असून येथे अशपाक खान या क्रूर भावाने अवघ्या 10×10 च्या खोलीसाठी आपल्या सख्ख्या बहिणीचे तुकडे करून ते खराडी येथे मुळा मुठा नदीपात्रात फेकून देण्यात आल्याची आहे.

तर दुसरी घटना ही पुण्यातील नानापेठ येथे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येची आहे. या घटनेत वनराज आंदेकर यांना त्यांच्याच बहीण आणि दाजीने मारेकरी पाठवून त्यांच्यावर गोळीबार करायला लावून त्यांचा खून करण्यात आल्याची आहे. वनराज यांच्या हत्येमागे एक दुकान कारणीभूत ठरले आहे. या एका दुकानामुळे बहीण, भावाच्या नात्यात कटुता येऊन त्याचे हत्येत रूपांतर झाले आहे.

वनराज आंदेकर यांची हत्या करण्याचा प्लॅन त्यांच्याच दोन बहिणी आणि मेहुण्यांनी केला असल्याचे आता उघड झाले आहे. पुण्याचे शहर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी वनराज आंदेकर यांचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना या हत्या प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली आहे.

या दोन्ही बहिणी आणि दाजींनी मिळून वनराजची हत्या घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लागोपाठ घडलेल्या या दोन हत्यांमुळे किरकोळ इस्टेटचा वाद किती विकोपाला जाऊ शकतो आणि नातीगोती विसरून आपल्याच रक्ताच्या नात्यातील लोकांच्या हत्या सुद्धा केल्या जाऊ शकतात हे आता या दोन्ही घटनांवरून सिद्ध होत आहे.