BIG BREAKING NEWS.. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक.. यवतजवळ सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे ग्रामीण पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत जवळ पुणे सोलापूर हायवेवर सुमारे 32 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा गुटखा व एक आयशर टेम्पो पकडण्यात आला आहे. ही कारवाई बारामती क्राईमब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथक आणि यवत पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार बारामती अपर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बारामती क्राईमब्रँचचे अधिकारी आणि पोलीस जवान हे पेट्रोलिंग करत असताना वाहने चेकिंग दरम्यान एका आयशर  टेम्पोच्या हालचालीबाबत त्यांना संशय आला. सदर टेम्पोच्या पाटस टोल नाक्यापर्यंत हालचालींवर लक्ष ठेऊन पाटस टोल नाका येथे ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर गाडीत बिस्किटे आहेत असे कळविले. त्यास अधिक विचारपूस करून टेम्पो चेक केला असता टेम्पोमध्ये चेकिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीने आतील बाजूस गुटख्याची पोती भरून मागचे बाजूला बिस्कीट चे बॉक्स भरलेले मिळून आले. सिकंदराबाद, तेलंगणा येथून पुण्याच्या दिशेने Eicher टेम्पो निघाला होता.

सदर टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा असा छापील बोर्ड लावला होता. सदरचे वाहन हे तेलंगणा येथून 540 km प्रवास करून आले. या कालावधी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक करून एवढे मोठे अंतर पार केले गेले. सदर आरोपींनी सदर वाहनाचा शासनाचा ऑनलाईन पास सुद्धा प्राप्त करून घेतला होता. सदरची कारवाई दि 14.4.20 ते 15.4.20 च्या रात्र दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मानसिंग  खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 राहणार गाझीपुर उत्तर प्रदेश) शीलदेव कृष्ण रेड्डी (राहणार सिकंदराबाद, हैदराबाद राज्य तेलंगणा) तसेच गाडी नंबर

TS10UA6081 यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सुमारे 22 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा सागर SGR – 2000 नावाचा गुटखा आणि 10 लाख  रुपये किमतीची आयशर टेम्पो असा एकूण 32 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करताना सोबतच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2,3,4 या प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, 

बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मा. जयंत मीना  (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,

यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे,  चालक रमेश मोरे तसेच यवत पोलीस स्टेशनचे रामदास घाडगे पोलिस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, अजित काळे, प्रशांत कर्णवर यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करत आहेत.