भोर | फॉरेस्ट मध्ये गुटख्याने भरलेला टेम्पो पुणे ग्रामिण पोलिसांनी पकडला, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त

भोर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील मोरवाडी (ता.भोर जि पुणे) गावाजवळ असलेल्या फॉरेस्ट क्षेत्रात टेम्पोमध्ये लपवून ठेवलेला गुटखा पुणे ग्रामिण पोलिसांनी पकडला असून सर्व मुद्देमालाची किंमत 73 लाख 85 हजार 400 रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल पकडण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस स्टेशनला विशेष सूचना दिल्या होत्या.

भोर च्या मोरवाडी येथील फॉरेस्ट जमिनीत लपवून ठेवलेला टेम्पो आणि त्यातील गुटखा पकडण्यासाठी पुणे ग्रामिण गुन्हे शाखा आणि राजगड पोलीस यांच्या टिमव्दारे संयुक्तरित्या मोहीम राबवन्यात येऊन त्या ठिकाणी एक विटकरी (तपकीरी ) रंगाचा टेम्पो नं. (एम.एच. १२ एम. व्ही. ८२४७) हा ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये विमल पान
मसाला, रजनीगंधा पान मसाला, सुगंधी तंबाखू असे प्रतिबंधीत पदार्थाचा माल, मोबाईल फोन असा एकुण रू. ७३ लाख ८५ हजार ४०० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

या कारवाई दरम्यान ऋत्विक दशरथ मोरे, (वय २४ वर्षे, व्यवसाय क्लिनर रा. मोरवाडी, पोस्ट किकवी, ता. भोर जि. पुणे) यास ताब्यात घेण्यात आले असून सदर गुटख्याचा माल हा सुधाकर कल्याण पानसरे, दिनेश कल्याण पानसरे (दोघे रा. शिवरे ता भोर जि पुणे) यांच्यासह मिळून पुणे येथील निजाम याच्याकडे घेउन जात असल्याचे त्याने दिलेल्या माहितीतून निष्पन्न झाले आहे. वरील सर्वांविरोधात राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार, (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण) हे करीत आहोत.

सदरची कारवाई ही विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पो.नि.अविनाश शिळीमकर, सहा फौज. हनुमंत पासलकर, पो.हवा. महेश बनकर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रमोद नवले, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, व राजगड पो.स्टे.चे पो. नि.श्री. सचिन पाटील, सपोनि नितीन खामगळ, पो.ना. नाना मदने, पो.ना. मयुर निंबाळकर, पो.कॉ. योगेश राजीवडे यांनी केलेली आहे.