उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमीपूजन

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण आज करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.

या उद्घाटन कार्यक्रमांतर्गत बोपखेल येथे मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पुस्तकाचे प्रकाशन व नवीन वाहनांचे उद्घाटन, निगडी येथे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे (आयसीसीसी) लोकार्पण, गणेश तलाव जवळ हरीत सेतू विषयक कामाचा भूमिपूजन समारंभ, पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलाचे लोकार्पण, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर सब-वे बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ, मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांच्यासोबत राबविण्याच्या कामाच्या टप्पा १ चा शुभारंभ, मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

बोपखेल येथे मुळा नदीवरील पुलाचे बांधकाम
बोपखेल येथे मुळा नदीवर १.८५६ कि.मी. लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्यासाठी ५३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. बोपखेल येथील नागरिकांना पिंपरी चिंचवड शहराकडे ये जा करण्यासाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी- खडकी मार्गावरून सुमारे १० ते १५ कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आता या पुलामुळे नागरिकांना २.९ कि.मी. अंतरावर खडकी कॅन्टोन्मेंट भागातून पिंपरी व पुणे शहराकडे ये जा करता येणार आहे.

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची (आयसीसीसी) शहरावर नजर
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्यावतीने इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) उभारण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची या केंद्राशी जोडणी करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक, विविध महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर २४ बाय ७ लक्ष ठेवण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोठे काही अनुचित प्रकार घडत असल्यास, वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. याशिवाय शहरातील कचरा उचलणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविलेली असून या वाहनांचे संनियंत्रणही या कमांड सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे.

पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. मुळा नदीवर सांगवी-बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह गतीमान होणार आहे. मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांचे सोबत राबविण्याच्या कामाच्या टप्पा १ चा शुभारंभ करण्यात आला असून त्यामुळे नदीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.