भीमनगर पिण्याच्या पाण्यापासून वंचित ! दौंड नगर पालिकेविरोधात दलित संघटनेचा मोर्चा

अख्तर काझी

दौंड : शहरातील भीमनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांना नगरपालिका पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहे, वारंवार तक्रार करून सुद्धा नगरपालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नगरपालिका जातीय द्वेष भावनेतूनच भिम नगरला पाणी देत नाही असा गंभीर आरोप करीत येथील नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेने नगरपालिका कार्यालयामध्ये आंदोलन केले.

संघटनेच्या वतीने आंदोलनाबाबत 20 जून रोजी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते, मात्र नगरपालिका प्रशासनाने भिम नगरच्या पाणी प्रश्नावर कोणताही तोडगा न काढल्याने दि.7 जुलै रोजी संघटनेच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात घोषणा दिल्या.

संघटनेने नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सर्वसामान्य माणसांनाही पिण्याचे पाणी मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता, परंतु आजही परिस्थिती बदललेली नाही. भीम नगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेकडे मागील 10-11 वर्षापासून पाण्याविषयी अनेकदा पत्रव्यवहार केले, परंतु तरीही भीम नगर येथील लोकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही.

नगरपालिका प्रशासन जातीवादी असून भीम नगरला पाण्यापासून वंचित ठेवून कर्तव्यात कसूर करीत आहे असा आरोप संघटने कडून करण्यात आला आहे. संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग गडेकर, सोनाली सर्वगौड, सविता कांबळे, नम्रता पंचाळे, लक्ष्मी शिंदे, नुरजहा तांबोळी, रूपाली गजरमल, पद्माबाई बनसोडे, प्रकाश सोनवणे, भाऊ वाल्मिकी, लांडगे दादा आंदोलनामध्ये सहभागी होते.