पुणे : दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. आज खासदार संजय राऊत यांची वरवंड येथे सभा आयोजित करण्यात आली असून या सभे अगोदर खासदार संजय राऊत भीमा पाटस कारखान्यावर जाणार होते मात्र तेथे 144 कलम लागू करण्यात आल्याने ते या ठिकाणी जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याबाबत खा.संजय राऊत यांनी माहिती देताना ‘मी भीमा पाटस कारखान्यावर जाणारच, भीमा पाटस कारखाना काय पाकिस्तानात आहे का’? असा सवाल उपस्थित करत पोलिसांचा फौजफाटा तेथे आणून तैनात करण्यात आल्याने त्यावरही त्यांनी टिका केली आहे.
आज सायंकाळी 5 वाजता खा.संजय राऊत यांची वरवंड येथे जाहीर सभा होत असून भीमा पाटस कारखान्यात सुमारे 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप खा.संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत आज ते पुन्हा एकदा बोलणार असून यावेळी ते कागदपत्रानीशी सभेत पुरावे मांडणार असल्याचे आयोजक सांगत आहेत.
वरवंड येथील सभेला शिवसेना नेत्या (उद्धव ठाकरे गट) सुषमा अंधारे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, आमदार रवींद्र धंगेकर यांसह तालुक्यातील पदाधिकरी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.