अब्बास शेख
दौंड : भिमा पाटस कारखाना अजित पवारांनी बंद पाडला होता. त्यांनी आत्तापर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आजूबाजूचे कारखाने बंद पाडण्याचा किंवा ते विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार म्हणतात की आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो मात्र ते जेलमध्ये जाऊ नये म्हणून भाजपसोबत गेले आहेत असा घणाघात रोहीत पवार यांनी अजित पवारांवर केला आहे. ते दौंड तालुक्यातील वरवंड येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.
वरवंड (ता.दौंड) येथे दि.4 मे रोजी दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रोहीत पवार यांनी आपल्या भाषणामध्ये अजित पवारांवर प्रखर टिका केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना, आपली लढाई वयक्तिक कुणासोबत नसून आपली लढाई दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, कुणी स्टेटस ठेवले तर त्यांना घाबरवले जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुणाला जर दम दिला जात असेल तर मला फोन करा मग मी पाहते असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांसह बाळासाहेब शिवरकर, राजेश टोपे, नामदेव ताकवणे, भूषणसिहं राजे होळकर, भास्कर जाधव, अप्पासाहेब पवार यांची भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणामध्ये शरद पवार यांनी बोलताना, पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस हा दौंड आणि शिरूर भागात आहे. तसेच इंदापूर भागालाही चांगला पाणी पुरवठा होतो. दौंड आणि शिरूर येथे जास्त ऊस असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या ठिकाणी पाणी भरपूर आहे आणि हे पाणी पुण्याच्या वर दूरदृष्टी ठेवून बांधलेल्या धरणांमुळे उपलब्ध होत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवारांनी पुढे बोलताना, पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त कारखानदारी पहायला मिळत होती त्यामुळे आपण विविध ठिकाणी midc आणल्या त्यामुळे कारखानदारीचे विकेंद्रिकरण होऊन रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांकडून पाटसकर आणि कुल कुटुंबाची स्तुती – शरद पवारांनी पुढे बोलताना दौंड चे माजी आमदार जगन्नाथ पाटसकर, सुभाष कुल, रंजना कुल त्यांचे चिरंजीव राहुल कुल यांची स्तुतीकरून या लोकांनी दौंडच्या विकासात मोठे योगदान दिल्याचे म्हटले आहे.
मोदींनी महागाई आटोक्यात आणण्याची आश्वासने दिली मात्र शब्द पाळला नाही – 2014 साली मोदींनी निवडणुकीवेळी मला निवडून द्या, भाजपला सत्ता द्या मी 50 दिवसांत महागाई आटोक्यात आणतो असे म्हटले होते मात्र आज 10 वर्षे झाली तरी महागाई आटोक्यात आली नाही. नेते निवडून येण्यासाठी आश्वासने देतात मात्र निवडणुका झाल्या की ती आश्वासने विसरतात असा टोलाही मोदींना लगावला.