अख्तर काझी
दौंड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती(14 एप्रिल) दिनी एका युवकाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती, याप्रकरणी नऊ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना आता दुसऱ्या गटातील युवकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या अक्षय शिखरे सह विकी शिखरे, शुभम वानखडे, विशाल काळे( सर्व राहणार दौंड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2)352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल जितेंद्र साळुंखे(रा. जनता शाळेसमोर, लिंगाळी रोड दौंड) याने फिर्याद दिली.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि.15 एप्रिल रोजी रात्री 12:15 च्या दरम्यान लिंगाळी रोडवरील जनता शाळेसमोर घडली. फिर्यादी, मित्राच्या घरी लावलेली आपली दुचाकी आणण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना दगड फेकून मारला तसेच शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रार केल्याने पोलिसांनी तब्बल 13 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. आंबेडकर जयंती दिवशीच्या हाणामारी घटनेतील जखमी अक्षय शिखरे यास येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.