| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील केडगावची बाजारपेठ म्हणजे जवळपास 15 ते 20 छोट्या मोठ्या गावांचे गरजेच्या वस्तूंचे खरेदी केंद्र. केडगावमध्ये काही ना काही खरेदी करण्यासाठी कायमच लोकांची ये जा सुरू असते, मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू आहेत.
त्यामुळे साहजिकच केडगाव येथे लोकांची ये जा, फिरणे बंद असेल असे वाटत होते. मात्र अनेकांनी फक्त बाहेर फिरण्यासाठी किराणा मालाची पिशवी गाडीला लावणे, डॉक्टरांची चिट्ठी खिशात ठेऊन औषध आणायला आलोय या थापा मारणे अशा वेगवेगळ्या आयडिया लढवून फिरणे सुरूच ठेवले होते.
लोकांच्या या आयडिया लक्षात घेऊन आता केडगाव पोलीस, केडगाव ग्रामपंचायत आणि केडगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बाहेर फिरणाऱ्या मोकाट लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून त्यांची अँटिजेन टेस्टही करण्यात येणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची थेट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.
त्यामुळे मोकाट बाहेर फिरून नियम मोडायचे की घरात बसून स्वतः आणि परिवाराला सुरक्षित ठेवायचे हे आता आपल्याच हातात आहे.