बारामती : बारामती येथे गेल्या तीनचार दिवसांपासून एक प्रकरण खूपच गाजत होते. या प्रकरणामध्ये एका महिलेचा अंत्यविधी घाईघाईने उरकण्यात आला होता. त्यामुळे काहीजण याला खून म्हणत होते तर काहीजण हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे म्हणत होते. मात्र शेवटी सत्य हे समोर आलेच असून त्या महिलेचा खून झाल्याचे आता पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येथील एक मयत महिला स्वाती (वय 50) हीचा अचानक मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने याबाबत काहींनी सोशल मीडियावर आवाजही उठवला होता. वरील मयत महिलेचे प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे (वय 63, कसबा, बारामती) यांच्यासोबत अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र प्रमोद फडतरे यांचे हे संबंध त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे (वय 34) व मुलगी (वय 33 ) यांना मान्य नसल्याने ते आपले वडील आणि त्या महिलेवर चिडून असायचे.
प्रमोद फडतरे यांचा 10 तारखेला वाढदिवस होता. त्या दिवशी ते त्यांच्या परिवारासोबत वाढदिवस साजरा करून आपल्या जुन्या घरी गेले आणि त्यांनी मयत स्वाती यांना भेटायला बोलवले. याची माहिती त्यांचा मुलगा आणि मुलीला मिळाल्यानंतर त्या दोघांनी थेट जुने घर गाठत वडील आणि त्या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात जबरी मारहाण झाल्याने मयत महिला स्वाती हीचा मृत्यू झाला असे पोलीस तपासत पुढे आले आहे. मारहाण करताना मुक्का मार लागला मात्र वरून कोणतीही जखम झाली नाही त्यामुळे त्या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र इतक्या घाई घाईत अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले. त्या महिलेचा खून झाला असताना प्रमोद फडतरे यांनीही मुलांच्या करीअरचे वाटोळे होऊ नये म्हणून हृदय विकाराने महिलेचा मृत्यू झाल्याच्या बनावामध्ये साथ दिली आणि तो मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र अखेर या खुनाला वाचा फुटली आणि बारामती शहर पोलीसांनी आरोपींना जेरबंद केले.
बापाच्या लफड्यापायी एक महिलेचा मृत्यू झाला तर कर्त्याधर्त्या दोन मुलांवर गुन्हा दाखल होऊन ते या प्रकरणात अडकले आहेत. आता यात पुढे काय होते याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.