पुणे : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय तर्कवितर्कांना तिलांजली देत आपला पक्ष बारामतीची जागा लढवणार असल्याचे जाहीर करत शरद पवार गटाला मोठा हादरा दिला आहे. आता अजितदादा गटाचा बारामतीचा उमेदवार कोण यावर तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबीर कर्जत खालापूर येथे आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये ते बोलत होते.
बारामतीची जागा आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज या शिबिरात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणूक साधारण मार्च महिन्यात लागले असे भाकीत वर्तवत लोकसभेच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या जागा आपण लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच उद्धव ठाकरे गटाची ताकद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या जागाही आपण लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
राज्यांच्या निवडणूका झाल्या आता जागा वाटपांवर चर्चा.. जागावाटप बाबत अजितदादांनी बोलताना, जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली असून पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील टप्प्यातील चर्चा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिरास सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता बोलून दाखवली आणि त्यासाठी तयारी करून राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांचे अजितदादांना उत्तर
अजित पवारांनी बारामती लोकसभेची जागा त्यांचा पक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले आणि बारामती लोकसभा मतदार संघामध्ये एकच खळबळ माजली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर उत्तर दिले असून मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा त्यांचा (महायुतीचा) अंतर्गत प्रश्न आहे. ही लोकशाही असल्याने मी त्यांच स्वागत करते असे त्यांनी म्हटले आहे आणि कुटुंब एका जागी आणि राजकारण एका जागी आहे. त्यामुळे नाती आणि राजकारण याची कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे यात काहीही गैर नाही. त्यामुळे बारामतीतील जनता ठरवेल, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही असं शेवटी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.