बारामती : बापानेच पोटच्या मुलाचा निर्दयीपणे खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पियुष विजय भंडलकर (वय ९ वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून त्याचे वडील विजय गणेश भंडलकर (रा. होळ ता. बारामती जि.पुणे) याने पियुष अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, पुढे चालून माझी इज्जत हा घालवणार असे म्हणुन त्यास हाताने मारहाण केली आणि नंतर गळा दाबुन त्यास भिंतीवर आपटुन त्याचा खुन केला असल्याची भयानक घटना पोलिसांच्या तत्परतेने उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विजय भंडलकर हा ज्यावेळी आपल्या पोटच्या मुलाचा खून करत होता त्यावेळी त्याची आई शालन गणेश भंडलकर ही सदरची घटना पाहुन देखील मुलगा विजय भंडलकर याला कसलाच प्रतिबंध करत नव्हती. पियुष याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवुन पडला आहे अशी खोटी माहिती तिने दिली तसेच विजय चा चुलत भाऊ संतोष भंडलकर याने देखील भट्टड डॉक्टर यांच्या येथे पियुष यास घेवुन गेलेनंतर तेथे विजय भंडलकर याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवुन पडल्याची खोटी माहिती दिली.
भट्टड डॉक्टरांनी पियुष हा मयत झाल्याचे सांगुन त्यास होळ येथील प्राथमीक आरोग्य केंद्र येथे घेवुन जाणेबाबत कळविले होते. मात्र तिन्ही आरोपिंनी संगनमताने जाणीवपुर्वक विजय भंडलकर याने पियुष यास त्याचा गळा दाबुन व त्यास आपटुन जिवे ठार मारुन त्याचा खुन केला असल्याचे कोणालाही कळता कामा नये व त्याबाबतचा पुरावा राहू नये म्हणून सदर मुलाचे प्रेत प्राथमीक आरोग्य केंद्र होळ येथे न आणता ते थेट गावी घरी घेवुन आले. गावात आल्यानंतरही त्यांनी सदर मयताबाबत पोलीस पाटील, अगर इतर कोणालाही कळविले नाही व त्यांनी त्याचे नातेवाईक बोलावुन घेवुन मयत पियुष विजय भंडलकर (वय९ वर्षे, रा. होळ ता. बारामती जि.पुणे) याचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे पोस्टमार्टम न करता त्याचा अंत्यविधी करण्याची तयारी केली होती. मात्र याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी हा सर्व बनाव उघड करत आरोपी विजय भंडलकर, शालन भंडलकर, संतोष भंडलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.