बारामती : बारामतीच्या माळेगाव येथील चार शेतकऱ्यांची सुमारे 60 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ऊसतोड करणारी टोळी देतो म्हणून या शेतकऱ्यांकडून लाखो रुपये घेण्यात आले मात्र या शेतकऱ्यांना ऊसतोड टोळीही देण्यात आली नाही आणि त्यांचे पैसेही परत करण्यात आले नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादींमध्ये मारुती आटोळे, सागर वाघमारे, प्रकाश खलाटे, रवींद्र चव्हाण या चार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांनी वेगवेगळ्या दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किसन राठोड (पोपटनगर, ता. पारोळ जि. जळगाव) भाऊसाब सिंधेरा (रा. ऐनगाळ, विजापूर) उत्तम शिंदे (रा. ऐनगाळ, विजापूर) मोरसिंग पवार (रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जळगाव) आणि शंकर कदम (रा. शेतकी अधिकारी, संघवी हाईट्स बारामती) या पाच जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरील सर्व शेतकऱ्यांची ऊसतोड टोळी देतो म्हणून फसवणूक करण्यात आली आहे. वरील आरोपींमध्ये एका शेतकरी अधिकाऱ्याचाही समावेश आहे हे विशेष. शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना ऊसतोड टोळी देतो म्हणून त्यांच्याकडून मोठी रक्कम घ्यायची आणि त्यांची फसवणूक करायची असा काहीसा प्रकार वेळोवेळी पहायला मिळत आहे. शेतकरी जर हे पैसे मागू लागले तर त्यांना फोनवर शिवीगाळ करणे, धमक्या देणे असे प्रकार होत असून जर शेतकरी या लोकांच्या गावी गेले तर तेथे त्यांच्यावर जमाव जमवून हल्ला करणे, मारहाण करणे असले प्रकारही घडले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.
त्यामुळे अश्या लोकांवर कठोर कारवाई करून पोलिसांनी त्यांना जेरबंद करणे गरजेचे असून अश्या लोकांवर विश्वास ठेवून मोठी रक्कम देण्याचे शेतकऱ्यांनीही टाळणे गरजेचे आहे. वरील सर्व प्रकरणांचा तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.