– सहकारनामा
बारामती :
पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. बारामतीमध्येही मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असून कोरोना विषाणूमुळे मृत्यु ओढवलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास कुणी सहसा धजावत नाही. आशा वेळी त्या मृतदेहांवर नगरपरिषदेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करत असतात.
त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता बारामती नगरपरिषदेने तत्काळ कोविड प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी अॅड. भार्गव पाटसकर यांनी मुख्याध्याकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भार्गव पाटसकर यांनी बोलताना गेल्या वर्षभरापासून बारामतीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू ओढवलेल्यांवर बारामती नगरपरिषदेचे कर्मचारी आपला जीव मुठीत धरून अंत्यसंस्कार करत असतात.
मात्र हे सर्व करत असताना हे कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांना तत्काळ लस दिल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.