दौंड मध्ये बकरी ईद, आषाढी एकादशी उत्साहात साजरी

अख्तर काझी

दौंड : दौंडमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांनी बकरी ईद व आषाढी एकादशी मोठ्या जल्लोषात साजरी केली. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले. यावेळी जामा मशिदीचे मौलाना मुबीन आतार यांनी सर्वत्र शांतता नांदावी व भाईचारा अबाधित राहावा म्हणून अल्लाह कडे प्रार्थना (दुवा) केली.

नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे येथील सर्वच पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील तेरा पालख्या येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात माऊलीच्या भेटीसाठी येत असतात. गावचे पाटील वीरधवल जगदाळे, इंद्रजीत जगदाळे व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी पालख्यांचे दौंड नगरीत स्वागत केले. शहरातील विविध पक्ष, संघटना तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने पालख्यांमध्ये सामील असलेल्या भक्तांसाठी उपवासाची खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले.

दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होत असल्याने संपूर्ण शहरामध्ये भक्तिमय व आनंदी वातावरण होते. पालख्यांच्या दर्शनासाठी दौंडकरांनी मोठी गर्दी केली होती. सर्व पालख्यांना येथील भीमा नदी तिरी स्नान घालण्यात आल्यानंतर पालख्या माऊलींच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात आणण्यात आल्या. माऊलींच्या भेटीनंतर पालख्या आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या. दौंड पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे दोन्ही सण शांततेत पार पडले.