‘डीजे’ आडून कुरखोड्या! गाव तसं चांगलं पण कुटील डावपेचांनी भंगलं..

सहकारनामा

गाव शांत रहावं, गावाची प्रगती व्हावी, चांगले रस्ते, पाणी, वीज आणि गावात मोठ्या शाळा व्हाव्यात अशी पहिली स्वप्न गाव चालवणारे पुढारी आणि गावाकऱ्यांची असायची आणि त्या संबंधीचे तसे प्लॅन आखले जायचे. आता मात्र काळ बदलला आहे. त्यामुळे आता गावातील विकासाच्या ज्या काही योजना आहेत त्या आमदार फंड, झेड.पी फंड आणि इतर योजनेतून मार्गी लागत असतात. त्यामुळे आता गावात गाव विकासाऐवजी, एक दुसऱ्याची जिरवा जिरवीचा एक कलमी कार्यक्रम आखला जातो आणि त्याचा फटका सर्वांनाच बसत असल्याचे अश्या अनेक प्रकारणांतून समोर येत आहे.
गावात एखाद्याचे लग्न, पूजा अथवा घरातील मुख्य कार्य निघाले की पारंपारिक गाणी, वाद्ये वाजवून आनंद साजरा करणे हे ओघाने आलेच. मात्र आता हे काळानुरूप बदलून ‘डीजे’ आणि लाऊड स्पीकरवरून कर्नकर्कश आवाजाची गाणी, रिमिक्सच्या गाण्यांची जास्त चलती सुरु झाली आहे. यात आवाजावर मर्यादा असल्या तरी अनेकजण हौस म्हणून ते उंच आवाजात लावतात आणि येथेच काहींचे कुटील डाव साधले जातात.

गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय कुरखोडीचा एक नवीन फंडा सुरु झालेला दिसत आहे. त्यामध्ये एखाद्याच्या इथे कुठला कार्यक्रम असेल किंवा लग्नाची वरात असेल तर त्या कार्यक्रमात जो अग्रेसर म्हणून मिरवत असतो त्याच्याच जवळचे अती विश्वासू हे ठरल्याप्रमाणे डीजे किंवा लाऊड स्पीकरच्या आवाजाबाबत एक निनावी फोन किंवा माहिती पाठवून त्याची माहिती जवळच्या पोलिसांना देतात. यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन मोठ्या आवाजात विना परवाना सुरु असलेला डीजे किंवा लाऊड स्पीकर बंद करण्यास सांगतात. हे सर्व होत असताना ज्याच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार घडत आहे तो संबंधित कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांना मोठ्या अविर्भावात, साहेब समजून घ्या राव, लग्नाचा कार्यक्रम आहे, सगळे आनंदी आहेत नका त्रास देऊ, आम्हाला माहित आहे कुणी हे केलं आहे अशी इमोशनल वाक्ये बोलून लोकांच्यामध्ये हिरो होण्याचा प्रयत्न करतात. मात्र पोलीस कुणाचे न ऐकता कायद्यावर बोट ठेवत हा सर्व प्रकार बंद करतात आणि मग सुरु होते स्क्रिप्टमध्ये ठरलेले खरे राजकारण…

मग यातील दोन तीन बोलवते धनी विषय रंगवत ह्या गावात कुणाला दुसऱ्याचे चांगले बघवतच नाही इथपासून ते आम्हाला माहित आहे हे कोणी केले आहे या वाक्यापर्यंत येऊन गावातील एखादा सामाजिक कार्यकर्ता, एखादा शासकीय अधिकारी, पत्रकार किंवा गावातील पुढारी यांची नावे चर्चेला घेऊन त्यांच्यावर निशाणा साधत राहतात. जेणेकरून त्यांच्याबद्दल द्वेष भावना रुजली जाऊन लोकांमध्ये एक दुसऱ्यात कटुता यावी आणि आपले पुढील स्वप्न साकार व्हावे हा यातील मुख्य उद्देश असतो.
मात्र हे कसं झालं, कुणी केलं हे फक्त या लोकांच्या कायम जवळ असणाऱ्या एक दोन कच्च्या बच्च्यांनाच माहित असते आणि ते शक्यतो याची वाच्यता कुठेच करत नाहीत.
पण याचा शोध लावणारेही काहीजण असतातच ते बरोबर मुळाशी जाऊन ज्यावेळी याचा शोध घेतात त्यावेळी डीजे समोर नाचणारी आणि कार्यक्रमात पुढे पुढे करणारी पिलावळच दुसऱ्यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने हे सर्व घडवून आणत असल्याचे समोर येते.

अनेक ठिकाणी असे काही प्रकार या अगोदर समोर आले असून यावर एकच उपाय म्हणजे शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसारच प्रत्येकाने आपला आनंद साजरा केला तर जवळच्याच मंडळींनी आपल्या विरुद्ध आखलेल्या अश्या षडयंत्रापासून कुणालाच त्रास होणार नाही.