दौंड (अख्तर काझी) : शहरात यंदा चांगला पाऊस झाला आहे. मात्र या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. येथील तुकाई नगर परिसरात पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांना रस्त्याने चालणे, घरातून बाहेर पडणे मुश्किलीचे झाले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वात मोठा त्रास येथील शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
पावसानंतर रस्त्यावर तयार झालेली पाण्याची डबकी व साचलेल्या चिखलामुळे या रस्त्यावरून चालणे अत्यंत कठीण जात आहे. परिसरातील काही विद्यार्थ्यांनी शाळेसाठी रिक्षा लावलेली आहे परंतु रस्त्याच्या झालेल्या प्रचंड दुरवस्थेमुळे रिक्षावाले काका या परिसरात यायलाच तयार नाहीत. या मुळे विद्यार्थ्यांना पाण्याच्या डबक्यातून व चिखलातून वाट काढीत शाळेत जावे लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन तुकाई नगर परिसरातील रस्त्याचे काम करून द्यावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
या परिसरातील रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली असून तब्बल 25 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर आहे अशी माहिती मिळत आहे, असे असताना मग रस्त्याचे काम का सुरू केले जात नाही असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.श हरातील बंगला साईड परिसरातील एका इंग्रजी माध्यम शाळेच्या समोरच्या रस्त्याची ही मोठी दुरवस्था झाली आहे. या शाळेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. थोडासा जरी पाऊस झाला तर विद्यार्थ्यांना पाण्याच्या साचलेल्या डबक्यातूनच वाट काढावी लागत आहे. नगरपालिकेने सदरच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी पालकांकडून होत आहे. या रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे परंतु रस्त्याचे काम मात्र सुरू करण्यात येत नाही अशी परिस्थिती आहे.