अख्तर काझी
दौंड : भीम अनुयायांनी संपूर्ण सप्ताह विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अतिशय उत्साहात व शांततेत पार पाडला परंतु जयंती दिवशी उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली. दि.14 एप्रिल रोजी रात्री एका युवकाला टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवीत, जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी दौंड पोलिसांनी, कुणाल साळुंखे, सिद्धार्थ सावंत, सुचित शेंडगे, ऋषिकेश शिंदे, जय डाळिंबे, पृथ्वीराज खंडाळे व इतर तीन अनोळखी साथीदार (सर्व राहणार दौंड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 189(2),191(2),191(3),190,118(2),115(2),351(2),352 , शस्त्र अधिनियम कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अक्षय बालीसाब शिखरे (रा. जगदाळे वस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 11.45 वा. दरम्यान येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर घडली. डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी फिर्यादी येथील आंबेडकर चौकात आले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा कुणाल साळुंखे यांना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाले.
त्यानंतर रात्री 11:45 च्या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना स्वामी समर्थ मंदिरासमोर बोलावून घेतले व त्यांना दमदाटी व शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.