पाटस (दौंड) : दौंड तालुक्यातील पाटस हद्दीमध्ये एका इसमाची हत्या करण्यासाठी 5 लाखांची सुपारी देण्यात येऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कट यवत पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या घटनेत पाच इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१७/१०/२०२४ रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास फिर्यादी वैभव दिवेकर हे त्यांच्या मोटार सायकलवरून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागुन आलेल्या हुंडाई वेनू या चार चाकी कार ने फिर्यादी यांच्या हिरो होंडा सी.डी.डिलक्स मोटारसायकल नं. एम.एच. ४२ सी. ९८४३ हिला पाठीमागुन जोरात धडक देऊन अपघात केला होता. या अपघातात फिर्यादीच्या दोन्ही खांद्याला, डोक्याला, कपाळास, उजव्या पायाला मार लागला होता. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन गाडी चालक तेथून पळून गेला होता.
सदर अपघाताची परिस्थिती पाहता पोलिसांना याबाबत संशय येत होता. घटनास्थळ आणि अपघातग्रस्त वाहनांची परीस्थीती पाहता सदर अपघात हा घातपात असल्याची दाट शक्यता पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांना येत होती. त्यांनी सदरची माहीती वरीष्ठांना कळवुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्रिंक विश्लेषन व सी.सी.टी.व्ही. तपासणी करून गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता सदरचा प्रकार हा अपघात नसुन अपघाताचा बनाव करून कट रचुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपास अंती निष्पन्न झाले.
यामध्ये संशयीत म्हणुन अक्षय गोपीनाथ चव्हाण (वय २७ वर्षे सध्या रा. पाटस ता. दौंड जि. पुणे, मुळ रा.खेड ता. कर्जतजि.अहमदनगर) हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यावेळी त्याने जखमी नामे वैभव दिवेकर (रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) यास चार चाकी गाडीने ठोस देवुन जिवे ठार मारण्यासाठी अक्षय बबन कोळेकर, (रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) याने मला तसेच तुषार चोरमले, सुरज विजय पवार (रा. पाटस, ता. दौंड जि. पुणे) लाला पाटील (रा. भिगवण ता. इंदापुर जि. पुणे) असे आम्हाला ५ लाख रूपयांची सुपारी दिली असल्याचे कबुल केले. यवत पोलिसांनी वरिल सर्व आरोपिंवर कायदेशीर कारवाई केली असून दोन आरोपिंना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. शेख हे करीतआहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख, पुणे ग्रा अपर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार (बारामती विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस (दौंड विभाग) यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख, पासेई वागज, पोहवा. गुरुनाथ गायकवाड, सहा. फौजदार महेंद्र फणसे, सहा. फौजदार अनिल ओमासे, सहा. फौजदार भानुदास बंडगर,पोहवा / हिरालाल खोमणे, पोहवा / अक्षय यादव, पोहवा / संदीप देवकर, पोहवा / महेंद्रचांदणे, पोहवा / विकास कापरे, पोहवा / रामदास जगताप, पोहवा / कानिफनाथ पानसरे, पोकॉ / मारूती बाराते, पोकॉ/ गणेश मुटेकर यांनी केली आहे.