बारामती : दौंड आणि बातमती तालुक्याला हादरविणाऱ्या सासरा आणि मेहुणीच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीने जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्या सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजना रमेश बाराते (वय 54, धंदा घरकाम रा. बारामती जि.पुणे मूळ रा. बाबुर्डी, बारामती) यांनी आरोपी विशाल सोपान वत्रे (रा. मसनेरवाडी ता. दौड जि.पुणे) याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल वत्रे याच्यावर BNS109,352,351(2), 351(3),333 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास फिर्यादी आपल्या प्लॅट नंबर 10 इ 1 बिल्डींग देवळे पॅराडाईज बारामती येथे असताना त्यांचा जावई विशाल सोपान वत्रे याने त्यांच्या पती व लहान मुलीच्या खुनाची केस मागे घ्यावी यासाठी त्यांचा गळा दाबून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना व त्यांच्या मुलीला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादित म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोसई सतिश राउत हे करत आहेत.
काय आहे प्रकरण… आरोपी विशाल सोपान वत्रे याने २०१६ साली त्याचे सासरे रमेश बाराते यांनी त्यांची शेत जमीन आपल्या नावे करावी म्हणून त्यांचा आणि मेहुणी शीतल बाराते हिचा हिंगणी गाडा येथून सुप्याकडे जात असताना आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेत शीतल ही जागीच मृत्युमुखी पडली होती तर रमेश बाराते हे रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाले होते. या नंतर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने आरोपी विशाल वत्रे आणि त्याच्या दोन साथीदारांना मोठ्या शिताफिने अटक केली होती. या दुहेरी हत्येची केस मागे घ्यावी म्हणून विशाल वत्रे याने आपल्या सासूलाही मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे संजना बाराते यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.